आजकालच्या ओव्या!
🚩
सनातनी कपाळकरंटे
घालती युगपुरुषाचेही वाटे
प्रवचने झाडूनी स्व-पोटे
जाळताती! ॥१॥
शिवराय धगधगता अंगार
हाती धरण्याचा नको अविचार
मिणमिणत्या दिव्याचा ना प्रकार
देव्हारीचा! ॥२॥
शिवराय विशाल हृदयाचे मालक
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
पण,गो-ब्राह्मणांचे प्रतिपालक
नव्हते कधी! ॥३॥
शिवराय वादळाला भिडणारे
गरुड उंच गिरीशिखरी उडणारे
अन्यायावर तुटून पडणारे
प्राणपणाने! ॥४॥
शहाजी-जिजाऊंचा पुत्र करारी
तुच्छ अवताराची काय मातब्बरी
सह्यगिरीमधून अजून ललकारी
घूमत असे! ॥५॥
राजांचा देव करण्याची खटपट
इरेला पेटले तमाम धर्मलंपट
बहूजनांवरचे हे वैदिक संकट
ओळखावे जी! ॥६॥
शिवरायांआडून छद्मचाल
राष्ट्रवादाचा बडवती ढोल
राष्ट्रवैरी ठरविती आजकाल
मुस्लिमांना! ॥७॥
सकल शिवनिंदकांची फौज
शिवरायस्तुतीची लूटते मौज
राज्याभिषेकविरोधाचा माज
दाविला ज्यांनी! ॥८॥
ऐशा पुराण-पोथ्यांची निर्मिती
शिवमहत्ता संपविण्याची कुनीती
हेमाद्रीची अवलंबिती दुष्टनीती
यादवकालीन! ॥९॥
शाहिरामुखी शोभे जयजयकार
पुळचटांचा भरला धर्मबाजार
पोटार्थी पुराणिकांची जीभ लाचार
वळवळते! ॥१०॥
भव्य शामियाना सजला भारी
शिवराय अवताराची पूर्णतयारी
भगवे पांघरुन मंचकी सर्प विषारी
फुत्कारती गा! ॥११॥
कुळवाडीभूषण राजियांची
किर्ती दिगंत युगप्रवर्तकाची
पुटे चढविती ब्राह्मण्याची
सकारण बा! ॥१२॥
'अवघे कर्तृत्व छत्रपतींचे
फलित, श्रेष्ठ वर्ण बुद्धीचे
आम्हीच कारण 'श्री' इच्छेचे'
ऐसा गा दंभ! ॥१३॥
स्वराज्य प्रपंचाचा संकल्प
शत्रूमित्राची अचूक पारख
मुलाहिजा जराही सुदिक
राखला नाही! ॥१४॥
खानाचा कोथळा काढला
कुलकर्णीही तिथे कापला
संपविला जो आडवा आला
स्वराज्यकार्यी! ॥१५॥
शिवशौर्याचा वैर्यांना धाक
हात लावाल तर व्हाल खाक
क्रूर वैदिकतेचे नाहक वाहक
नका बनवू! ॥१६॥
🚩 -भरत यादव
Bharat Yadav