सफदर हाश्मी यांना खुले पत्र

सफदर हाश्मी यांना खुले पत्र

सफदर हाश्मी यांना खुले पत्र...
                    
अनेकदा मला असा प्रश्न पडतो की खरं सांगायची खरोखर गरज असते? तेही जेव्हा जीव धोक्यात असतो तेव्हाही! ती कुठली गोष्ट आहे, कोणती ती ऊर्जा,जी हे सर्व घडवते? मला वाटतं या सगळ्यांमागे एक स्वप्न आहे. एक दिवस सर्व काही ठीक होईल हे ते स्वप्न.कोणीही वंचित आणि शोषित राहणार नाही हे स्वप्न.जग बदलता येईल असे स्वप्न.
ते स्वप्न जे आज मान्य नाही.
काय कॉम्रेड सफदर!!!  
मी बरोबर बोलतोय ना...?

कॉम्रेड!  तुम्ही आज जिवंत असता तर ६९ वर्षांचे असता!  मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा ते मला तुमच्या हौतात्म्याची आठवण करून देते. १ जानेवारी रोजी 'हल्ला बोल' नाटक करत असताना तुमच्यावर हल्ला झाला होता.तो २ जानेवारीचा दिवस होता!  तो दुर्दैवी दिवस!  जेव्हा तुम्ही जगातून निघून गेलात.
तुम्ही अवघ्या चौतीस वर्षांचे होता...

कॉम्रेड! आपला फोटो पाहिला!  तुम्ही खूप सुंदर दिसत होता!  
रुंद कपाळ!  कुरळे केस!  
आणि चष्मा… तुम्ही दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजीत एम.ए. केले होते.जिथे तुम्ही फेडरेशन ऑफ इंडियाच्या सांस्कृतिक शाखेशी जोडले गेलात.बंगाल सरकारमध्ये माहिती अधिकारी झालात पण १९८४ मध्ये नोकरी सोडून दिली.   
का? कॉम्रेड! आजच्या काळात कोणालाही विचारा त्याच्यासाठी नोकरी किती महत्त्वाची आहे ते! सध्या नोकरी निभावणे हीच सर्वात मोठी कला मानली जाते.

कॉम्रेड!  तुम्हाला हवे असते तर शांतचित्तपणे तुम्ही आरामदायी जीवन जगू शकले असता!
असो, ३४ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही!  तसेही, तुम्ही गेलात तरी कुठे!  तुम्ही आजही जिवंत आहात!  कुठेतरी पथनाट्य असले की मला तुम्ही दिसता!  जेव्हा एखादा तरुण अत्याचाराविरुद्ध उत्कटतेने बोलताना पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की तुम्ही तिथे असता तर कसे बोलले असता? जनसामान्यांपर्यंत कला पोचवण्यासाठी तुम्ही पथनाट्याला सर्वोत्तम माध्यम मानले होते, हे मलाही समजते!

कॉम्रेड!  तुमच्या स्मृतीदिनानिमित्त पथनाट्याच्या दिशा-दशेवरही बोलले जाते. मला अनेकदा एक प्रश्न पडतो की तुम्ही १९७३ मध्ये जननाट्य मंच का निर्माण केला!  तुम्ही केव्हातरी इप्टाशीही जोडले गेले होता.एक मात्र नक्की की तुम्हाला पथनाट्यालाच मशाल बनवायची होती.नाहीतर ‘ऐसे गांव से शहर तक’, ‘हत्यारे और अपहरण भाईचारे का’, 'तीन करोड’, ‘औरत’, ‘डीटीसी की धांधली’ अशी नाटकं कुणी लिहिली असती? आणि एवढेच नाही तर १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतरही ठिकठिकाणी नाटके कुणी केली असती?  
तर त्यावेळी भले भले तथाकथित लोकशाहीवादी सत्तेसमोर लोटांगण घालायला लागले होते!  दोन लाखांहून जास्त लोक तुमचे नाटक 'मशिन' पाहायला आले होते,असं ऐकलं!  क्या बात है कॉमरेड! 
भारीच की!

कॉम्रेड! एक गोष्ट सांगतो!  
तुमचे ‘औरत’ हे नाटक मी माझ्या शहरात अनेकदा पाहिले आहे!   तुमचे आणखी काही चाहते आहेत, जे दरवर्षी तुमच्या पुण्यतिथीला लखनौ येथे पथनाट्य सादर करतात.  इथल्या सीपीएम ऑफिसमध्ये तुमच्या नावाचा मंच असला तरी… तुम्ही म्हणायचे की नाटक कुठे करायचे हा मुद्दा नाही!  
माझे हे म्हणणे वाचून तुम्हाला हसू आलंच असेल!

कॉम्रेड!  
तरुणांवर तुमचा खूप भरवसा होता असे वाटते! आज त्याच्याकडे केवळ मतपेढीच्या दृष्टिकोनातून 
पाहिले जाते.  
भ्रष्टाचार या विषयावर नाटक बसवून जनजागृती करायची होती तुम्हाला.  तुम्हाला कलेच्या माध्यमातून जनचेतना वाढवायची होती.  
तुमच्या जन्मापासून (जननाट्य मंच) तरुण आणि मजूर मोठ्या संख्येने आणि मनापासून जोडले गेले आहेत यात शंका नाही.तुमच्या हौतात्म्यानंतर गाझियाबादच्या साहिबााबादमध्ये ज्या ठिकाणी तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्याच ठिकाणाहून ४ जानेवारीला ‘हल्ला बोल’ हे नाटक
सादर करण्यात आले!  
यापूर्वी असे काहीही घडले नव्हते!

कॉम्रेड!  त्यावेळी दूरदर्शनवर प्रसारित होणारे ‘पढ़ना-लिखना सिखो/ ओ मेहनत करनेवालों’ हे गाणे तुम्ही लिहिले आहे हे कळल्यावर मला खूप आश्चर्य वाटले!  आम्ही लहानपणी हे गाणे खूप गायचो.नाटकं, गाणी, कविता, दिग्दर्शन, डॉक्युमेंटरी, टीव्ही सिरियल… तुम्ही कमाल आहात कॉमरेड!  अरेच्चा आठवलं! तुमची ती कविता ‘पुस्तके काही सांगू पाहतात/तुमच्यासोबत राहण्याची त्यांची इच्छा आहे!/पुस्तके बोलतात/भूतकाळाबद्दल/जगाविषयी, माणसांविषयी...’ हे अनेक पुस्तक मेळ्यांमध्ये पोस्टरवर लिहिलेले मी पाहात आलोय.   कॉम्रेड, तुम्हाला माहीत आहे!  आमच्या लखनौ शहरात पुस्तकांचे खूप मोठे दुकान आहे. तिथं प्रवेश करताच तुमची ही कविता लिहिली आहे, तिथे पाहणाऱ्याच्या नजरा तीवर सर्वात आधी पडतात.

कॉम्रेड!  तुमच्या जीवनाकडून खूप काही शिकता येण्यासारखे आहे.
जीवन जगणे तुमच्या जीवनातून शिकता येऊ शकते.
कलेला लोकचळवळीचे साधन कसे बनवायचे हे आपल्या जीवनाकडून शिकता येऊ शकते.
तुमच्या आयुष्यापेक्षा सत्ता कितीही ताकदवान असली, तरी तुम्ही जे बोलता ते खरे असेल आणि ते सांगण्याची कला तुमच्याकडे असेल, ज्याद्वारे जनता जागरूक होऊन प्रश्न विचारू शकते, तर कोवळ्या तरुणाचीही सत्तेला भीती वाटू शकते.

कितीही संकटे आली तरी स्वतःच्या नावास साजेसे जगता येते हे आपल्या जीवनातून शिकता येते.  तुमच्या नावाचा अर्थ योद्धा आहे
दूसरा अर्थ रांगा तोडणारा आणि तुम्ही तसेच केलेत.
आपल्या आयुष्याकडून आम्ही शिकू शकतो की मरुनदेखील कसे जिवंत राहायचे ते!

लाल सलाम काॅम्रेड! 
मिस यू!!

मूळ हिंदी लेखन
©अनुप मणी त्रिपाठी
Anoopmani Tripathi
---
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

प्रसिद्धीः 
बाईमाणूस
ता.२ जानेवारी २०२४
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने