ट्रम्पच्या रुपाने हुकुमशहाच बोलला
अनिवासी भारतीय हवालदिल झाला
स्वातंत्र्यदेवतेलाही आता बेड्या घाला
निघेल आदेश!
शपथविधीला का उपस्थिती नव्हती
विषगुरुची ट्रम्पने तोडली काय दोस्ती
अवैध घूसखोरीतही तेथे तमे गुजराती
असती अव्वल!
युद्धखोर देशाची आता नवी दादागिरी
सीमा केल्या कडेकोट निर्बंध झाले जारी
कोणकोण किंमत मोजणार आहे भारी,
कळेना अजून!
ट्रम्पच्या ताटाखालचे इस्त्रायल मांजर
'ज्यू'लाॅबी ट्रम्पमागे उभी आहे खंबीर
आभासी सेनेचा शेणापती गा सुंदर,
शोभतो मस्क!
परकीयांना आता म्हणे ट्रम्प रोखणार
'युएसए'ची ताकद कैकपटीने वाढणार
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्या काढणार
लिबर्टीमाय!
नैसर्गिक साधनांवर गाजवणार हक्क
गरीब राष्ट्रांची तर मुस्कटदाबी चक्क
जागतिक शांततेला कायमचाच ब्रेक
अमेरिकेमुळे!
युद्धग्रस्त राष्ट्रांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा
मध्यपूर्वेमधला सारा खनिजतेलसाठा
हेरगिरी असो किंवा मोबाईलचा डाटा
मुठीतच ठेवू!
ड्रॅगनच्या प्रगतीची मनामध्ये धास्ती
न्यूनगंडाने पछाडल्याची चिन्हे दिसती
उदारमतवादी देशातली कट्टरताभक्ती
अनाकलनीय!
नाझीप्रेमींची चलती ट्रम्पच्या भोवती
नवहिटलरची होणार का पुनः उत्पत्ती
भांडवलशाहीच्या बळावर सगळी मस्ती
चालली आहे!
अत्याचारच इतिहासाचा मूळ गाभा आहे
रेड इंडियन्सच्या थडग्यांवर देश उभा आहे
उन्माद्यांना खडसावण्याची चर्चला मुभा आहे
नशीबच की!
कुणाकुणाचे आणखी शिव्याशाप खाणार?
लोकशाहीवादी जनता नक्की कान टोचणार
इथल्यासारखी मिडिया तिथेही झुकणार,
का सत्तेपुढती?
विश्वकल्याणाची आता करुणा भाकावी
भडकणारी आग द्वेषाची वेळीच रोखावी
विषगुरुची लाज ट्रम्पतात्याने झाकावी
हीच विनवणी!
-भरत यादव
Bharat Yadav