'सकाळ'च्या पारी हे गा अपेयपान!
'खरे' ठोकी बोंब चक्क खोटेपणानं!
जनसागरास म्हणे रस्त्यावरची घाण!
कुत्सीतपणे!
सदाशिवपेठेस झाला नवसाक्षात्कार
शेंडी-जानव्याचा पुन्हा सोवळेबाजार
कुपमंडूकांचा घोर कुपमंडूकीविचार
लोकद्रोही!
रस्त्यावरची शिस्त शिकवावी कुणी?
घरातले देव आणले रस्त्यावर ज्यांनी!
सनातनी जे जे तेच महान आणि गुणी
यांच्यालेखी!
आमच्या 'आव्वाजा'ची तुला रे अॅलर्जी
काव्यखोरास प्रदूषणाची का काळजी
समाज मना डसणारी वृती आधी तुझी
बदलावी!
आहाहा! किती ही विकृती सनातन
कालही आजही नाकर्तेच बहूजन
आम्ही सांगू तयाचेच करावे पालन
हाचि धर्मु!
खवूट शेंगदाण्याचा कुणाला वारसा
मुक्तीदात्यांचा ठसा विसरावा कसा?
गुलामांना दावला उजेडाचा कवडसा
काळोखात!
पिढ्यानपिढ्या झाला होता अत्याचार
सरंजामी सनातनी जुलूमाचा कारभार
आता कुठे घुसमटीला वाट थोडी फार
मिळतसे!
पण म्हणून व्यसनांची नाही भलावण
उत्सवाच्या उत्साहाला असावी वेसण
मातोश्रींप्रती आमच्या तुझा दृष्टिकोन
धिक्कारार्ह!
तुकोबांच्या अभंगांचा तुलाही आधार
हाच वसावारसा आमचा जिवंत सुंदर
मनातला मंबाजी तुझ्या होवो हद्दपार
ही प्रार्थना!
-भरत यादव
Bharat Yadav