🚩
ढुंगणाला पाय लावून कोरटकर पळाला
रीतसर कुणी त्याला देशाबाहेर घालवला
जातीसाठी कुणी किती कायदा वाकवला,
कळेल का?
अस्मितेच्या अपमानाचे नाही देणे-घेणे
महामानवांच्या नावाने फक्त मते मिळवणे
सत्तेवर आलो आणि विस्मरलो आश्वासने,
सोयीस्कर!
निगरगट्ट गृहमंत्री लाभले आम्हांला
विषवल्ली ठेचायची इच्छा नसे ज्याला
दिल्लीपती पाठीशी,भ्यावे गा कोणाला
देशामध्ये!
शिवद्रोह्यांमागे ही सत्ता उभी ठामपणे
बंद करा महाराष्ट्राला असे डागण्या देणे
किती छिंदम किती कोरटकर पैदा होणे,
आहे बाकी?
पेठेमधल्या कुचाळक्यांना नाही धरबंद
वेगाने नासतोय आपला मुलूख सबंध
विडा उचलती बदनामीचा एकमेव छंद
आजकाल!
कलमकसाई किती आले आणि गेले
इतिहासाची सातत्याने विटंबना चाले
सत्याच्या उत्खननाची उधळली फुले,
जोतीबांनी!
घरे जाळा,माणसे मारा,घाला नंगानाच
निरपराध नागरिकांना पोलिसांचा जाच
जहर ओकणार्यांपुढे नत सारस्वतमंच,
कणाहीन!
जातीसाठी माती खाणे बंद व्हावे आधी
भारताला जडलेली संपवावी महाव्याधी
देशबुडव्या पेशवाईची चालवू नका गादी,
आता तरी!
वर्तमानाच्या मानगुटीवर भुतकाळ फिरे
पेटवापेटवी करणारे मग म्हणती पूरे पूरे
दगाबाज सिंहासनाला गद्दारीचे पहा तुरे
खोवलेले!
शिवरायांच्या जयजयकारे हिंदभूमी हादरे
कबरीमधला औरंगजेब तो पुन्हा पुन्हा मरे
नाकर्त्यांच्या नादात जाहली अब्रुची लक्तरे
रयतेच्या!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav