दीनानाथा...!
दीनानाथा,कैसा पैशाचा हा रोग?
अर्भकांच्या भाळी मातेचा वियोग
काळजाला डागण्या देणारा प्रसंग,
दुःखदायी!
सूरांची बरसात केली कधीकाळी
अतिलोभ-मोह मात्र आता जाळी
मंगेशाची किमया आटूनिया गेली,
दीनानाथा!
रुग्णसेवेसाठी आधी लाटली जमीन
उभारीले रुग्णालय बाबाच्या नावानं
शासकीय दान झाले धंद्याचे ठिकाण,
दीनानाथा!
कोट्यवधींचा कर निर्लज्ज बुडविती
गरजूंसाठी मात्र दहा लाखांची सक्ती
राजकीय नेते करती उघड अंधभक्ती,
दीनानाथा!
किड्यामुंग्यासारखे लोकांचे जीवन
चेंगरुनी मरा वा औषधोपचाराविन
धनदांडग्यांच्या सेवेचे बांधले कंकण,
दीनानाथा!
शासकीय योजनांना नाही येथे थारा
सरकारी यंत्रणेचा उडाला बोजवारा
जीवे मारण्याची ही इस्पितळी तर्हा,
दीनानाथा!
ताल बिघडला आणि बेसूरला सूर
धनलोभाचे नाव झाले मंगेशकर
कणव करुणा ना उरली तीळभर,
दीनानाथा!
इवलेसे जीव होती जन्मता पोरके
रुग्णालये वर्तती जल्लादासारखे
माऊलीचा बळी घेती कडू दोडके,
दीनानाथा!
सेवाधर्म होई आता कमाई साधन
गोरगरीबरुपी गाय कसायाची धन
मरुनिया जाय माणुसकी तडफडून,
दीनानाथा!
खासगी दवाखाने झाले खाटीकखाने
रुग्णांच्या जीवाशी ना राहिले देणेघेणे
प्रेताच्या टाळूवरचे लोणी निर्लज्जपणे
खात जाती!
-भरत यादव
Bharat Yadav