हिंदीचा बुलडोझर मराठीवर घाला
आता महाराष्ट्र खरा गायपट्टा झाला
गुलामांची फौज सज्ज,थुंकी झेलायला,
दिल्लीशहाची!
मनसबदारांची निष्ठा पातशहाच्या पायी
ताठकणा,स्वाभिमान इतिहासजमा होई
प्रजाहितदक्ष असे आता कुणी उरले नाही,
महाराष्ट्रदेशी!
अभिजात मराठीचे दाखवून मधाचे बोट
माय मारा आमची मावशीशी लावा पाट
मराठी जनता पोरकी करण्याचा हा घाट,
घातला असे!
पोटार्थी कथाकारांना कोट्यवधींची सुपारी
महाराष्ट्र नासविण्याची दिलेली जबाबदारी
संघप्रणीत प्रचाराची नांगी कट्टर विषारी,
ठेचावी आधी!
भूकेकंगालांचा लोंढा महाराष्ट्र मुलूखी
मराठीने वाहावी म्हणे,हिंदीची पालखी
लाचारांनी आता बुट चाटायचेच बाकी,
ठेवले आहे!
मराठीप्रांतावरती ही हिंदीची चढाई
स्वअस्तित्वास्तव लढू निकराची लढाई
एकधर्मी,एकभाषी राष्ट्राची नको बढाई,
फुकटचीच!
दक्षिण भारताचे महाराष्ट्र महाद्वार
कट्टर धर्मखोरांची पडे त्यावर नजर
दख्खनी घूसण्यास हिंदीसक्तीचे हत्यार,
उपसलेले!
'मराठीचे अवघे नामोनिशाण मिटवावे'
दिल्लीपतीचे जारी अलिखीत फतवे
उत्तरेचे आक्रमण पूर्ण परतवून लावावे,
मर्हाटियांनो!
-भरत यादव
Bharat Yadav