आजकालच्या ओव्या!
नेहमी इतिहासात जे रमती
मेलेल्यांच्या कबरी खणती
भूतकाळाचा उकंडा फुंकती,
अभिमानाने!
वर्तमानाचे न बाळगती भान
ठेवून गा स्वतःचा मेंदू गहाण
छू म्हणता तुटून पडणारे श्वान,
हे मालकांचे!
फेकतील ते चघळती हाडूक
विवेकबुद्धीची शून्य गुंतवणूक
देशबुडवे वारंवार ती घोडचूक
करीत र्हाती!
खर्या धर्माची करती माती
कर्मकांडाचीच महती गाती
माणुसकीचा दिवा मालवती
कर्मकरंटे!
असत्याचाच मिरविती टेंभा
लवलवती निष्ठुर विषारी जीभा
भारतीय राज्यघटनेचाच गाभा,
फाडू बघती!
राजकारण्यांनी पेटवली आग
गुलामांना गुलामीचा ना राग
फैलावला कट्टरतेचा महारोग
भारतदेशी!
लोकशाहीस गिळावया टपले
गंगायमुनेचे प्रेमजळ आटले
देशाची अजून शंभर शकले
करु पाहती!
सामाजिक सलोख्याचे वैरी
धर्मा-धर्मात वाढविताती दरी
तप्त तव्यावर भाजती भाकरी
हरामखोर!
विकासाच्या मारती फक्त बाता
भिकारडी केली अवघी जनता
ज्याला त्याला जगण्याची चिंता
सतावते आहे!
मूठभर धनदांडग्यांसाठी केवळ
सरकारसत्तेचे विणले मायाजाळ
साधनसंपत्तीच्या लुटीची चंगळ
सुरुच आहे!
-भरत यादव
Bharat Yadav