मांडीला जखम
शेंडीला मलम
हिंदीचे गुलाम
झालो आता!
मुंबईतून निघे
दिल्लीचे फर्मान
मराठीचे प्राण
संकटात!
पाय चाटताना
लाचारांच्या झुंडी
आम्ही खाली मुंडी
घातलेली!
सह्याद्रीचा आता
मेला स्वाभिमान
भाषा अभिमान
संपलेला!
जोडला मुलूख
गोबर पट्टयाला
कणखर खुंट्याला
हलवले!
वाजतो चौफेर
गद्दारीचा ढोल
सत्तेचे दलाल
मातलेले!
सत्तासंपत्तीला
चटावले वळू
नरडे आवळू
मराठीचे!
व्यर्थ सांडलेले
हुतात्म्यांनी रक्त
जो तो इथे मत्त
सत्तेतच!
सत्ता देई पद
सत्ता देई धन
मान नि सन्मान
सत्तेतून!
भाषेचा विनाश
संस्कृतीचा र्हास
जीवघेणा पाश
हिंदीचा हा!
मावशीचे कोड
पुरविती खंडी
माय देशोधडी
लावताती!
भाषेचे मरण
पाहू या रे डोळा
गिधाडे ही गोळा
झाली सारी!
हिंदीसक्तीमागे
ठाम दिल्लीपती
मांडलिक वृत्ती
बोकाळली!
आम्ही नेभळट
लादूनिया घेतो
पुत म्हणवितो
मराठीचे!
कुण्याही भाषेचा
नाही नाही द्वेष
सक्तीचा हा फास
असह्य गा!
बोलेन मराठी
जगेन मराठी
मरेन मराठी
अखेरीस!