🇮🇳
बा स्वातंत्र्या...कुठंयस नेमका तू?
कष्टकर्यांच्या फाटलेल्या झोपड्यात
की भयग्रस्त आदिवासी पाड्यात?
की अमर्याद राजकीय सत्तेच्या
संवेदनाशून्य अमानुष वेढ्यात?
संसदेच्या निर्जीव भिंताडात की
रक्तरंजीत हैदोसझुंडीला चटावलेल्या
देशबुडव्या,उन्मादी धर्मखोरांच्या गराड्यात?
हुकूमशाही व्यवस्थेच्या जुलमी
अत्याचाराच्या सापळ्यात
अडकलेल्या असहाय्य स्वाभिमानी
राजद्रोह्यांच्या जडशीळ बेड्यात?
की सत्ताधीशांपुढे मान तुकविणार्या
कवी-लेखकांच्या निष्क्रिय तांड्यात?
की नवनिर्माणाची आस असलेल्या,
व्यवस्थापरिवर्तनाच्या ध्येयाने
पेटलेल्या आणि माथ्यावर राष्ट्रद्रोहाचा
डाग वागविणार्या विद्यार्थ्यांच्या झेंड्यात?
की पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटणार्या,
स्वअस्तित्वासाठी स्वजनांशी झगडत
असलेल्या आयाबहिणींच्या प्राणांतिक लढ्यात?
स्वातंत्र्या आहेस का रे तू जिवंत?
.....की तुझ्याही उडाल्यात चिंधड्या
समता-अभिव्यक्ती आणि
गलितगात्र बनलेल्या लोकशाहीमूल्यांसारख्याच?
🇮🇳
©भरत यादव
Bharat Yadav
चित्रः
Mohan Des
मोहन देस