पावसाची मरणझड कोसळते शिवारात
नदीमायचे थैमान कुणब्यांच्या वावरात
झाला दुश्मन पाऊस आणि नदी वैरीण
पीक-माती,गुरंढोरं सारं नेलं खरवडून
पाणीटंचाई आमच्या पाचवीला पूजलेली
अतिवृष्टीने अवचित माळराने थिजलेली
अवर्षणग्रस्त आम्ही,आम्ही उन्हाची लेकरं
धरणवंत असूनही नित्य पाण्याची फिकीर
पूरपर्यटनासाठी पुढार्यांच्या झुंडी फार
निधीचा वं न दिलासा आश्वासने खंडीभर
नका हिणवू कुणी रं आता दुष्काळी म्हणून
तीन पिढ्यांचा पाऊस,गेला यंदाच बरसून
गेला करुन उजाड,नांदणारी वस्ती,घर
जगण्याची केली दैना,उघड्यावर संसार
गेली बुडूनिया शाळा,पाटी,पुस्तक,दप्तर
जलसमाधी शिक्षणाला,पडे गरीबाला घोर
असा अस्मानी कहर कोण कुणब्याला वाली
सत्ता असो कुणाचीही,त्याची रिकामीच झोळी
ओल्या दुष्काळाची छाया काळवंडले शिवार
गेली मालन पाण्याला तिची बुडाली घागर
भरत यादव