तोंडाने बडवावे आदर्शाचे ढोल
चालावी आपण असत्याची चाल
पक्षहितासाठीच देशहिताची ढाल
पुढे करती!
सत्यवचनी रामाचे गाती गुणगान
भ्रष्टाचारात आकंठ होती रममाण
मंदिरे उभारुन,ध्वजा फडकावून
ढोंगे रचती!
हे राम! उच्चारुन सोडलेला जीव
मारेकर्यांचा त्यांच्या अजून बचाव
खुन्याच्या प्रेरणेचा हा सत्ताउत्सव
चालला असे!
उच्च आदर्शाचे ज्यांनी थडगे रचले
उभे राहून त्यावर थयाथया नाचले
सत्य जे जे तेच असत्याला डाचले
खोल पर्यंत!
धूर्त वैदिकांचा पाताळयंत्रीपणा
रोग जुनाटच जडलेला बहूजना
झिरपते सर्वांगात विष पुनःपुन्हा
अनुकरणाचे!
पौराणिक कल्पनेचे रचती थोतांडे
छद्म-बेगडी उजेडात उजळती थोबाडे
धर्म उन्मादाचे बुडास सुटती बुडबुडे
कुपमंडूकांच्या!
मंदिरावर धर्मध्वजा फडफडत आहे
अत्यानंदाने हात थोर थरथरत आहे
हिंदूराष्ट्र पाहा आता दृष्टीपथात आहे
मनुप्रणीत!
असत्यसत्तेची गा हीच तपपूर्ती
ब्राह्मण्याची न्यावी वाढवीत किर्ती
शेतकरी-कष्टकर्यांची करुनी माती
बहू निर्ढावले!
अजस्त्र सत्तेपुढे कमी पडे बळ
रक्तपात जंगलात आदिम छळ
अथक संघर्षाचा काळ हा अटळ
प्रतिक्रांतीचाच!
निबीड अरण्यातली संपली भीती
जलजमीनजंगलात कार्पोरेट शेती
लोकशाहीच्या उरावर क्रूर थैलीपती
मिरवती आज!