🚩
विश्वासाने केली
दगाबाजी ऐसी
वाचकांची खाशी,जिरवली!
तुम्ही ही निघाले
'पुरंदरें'चेच चेले
रिचवले प्याले,लबाडीचे!
'कादंबरी'तला
कल्पनाविलास
तोच इतिहास,म्हणवती!
लेखन-फितूरी
केली कशासाठी?
तुच्छ पदांसाठी,लाचारी गा!
कुणाचा दबाव
आला सांगा तरी
कुणी बरे सुरी,दाखवली?
लिहीले ते खोटे
की बोलले ते खोटे
काय तोंडावाटे,कबूलले?
खोटारडेपणाचा
मांडला बाजार
आणि दरबार,केला घाण!
समरसतेने
साधलेला डाव
विश्वासाचा गाव,उठलेला!
लेखनकामाठी
की जातीनिष्ठ निती
अजून बा किती,फसवाल?
कलम-कसायांनी
केला घातपात
रक्तातच दौत,भिजवली!
बदला कितीही
तुम्ही इतिहास
अविरत साक्ष,सह्याद्रीची
लेखकूपणाची
प्रतिष्ठा लयाला
घुंगरु पायाला,बांधलेले!
गुलामगिरीत
रुतलेला पाय
पाटलाने टाय,घातलेला!
अध्यक्षपदाचा
लाभला बा तुरा
मोराचा पिसारा,फुललेला!
भाटगिरीसाठी
लाळ घोटताना
आणि सरपटताना,पाहिलेले
एका लेखकाचे
घोर पानिपत
आणि अधःपात,जाहलेला!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav