संविधान विरुद्ध मनुस्मृती

संविधान विरुद्ध मनुस्मृती

संविधान विरुद्ध मनुस्मृती
🍁
मनुवादी बाईला या
नाही उरलेली चाड
शिवनेरी गडावर
विष ओकते रग्गड

घेते शपथ घटनेची
करी मनुची आरती
वर्णवर्चस्वाचे किडे
मेंदूमध्ये वळवळती

मेंढी हुरळून जाय
गाय कसाबा धार्जिण
स्त्रीदास्याचा हा तुरुंग
पड बाहेरी फोडून

मनुस्मृतीची महती
नका सांगू नका गाऊ
मनू कापू पुन्हा पुन्हा
घोट घोट रक्त पिऊ!

दर युगात अवतरे
नव्या नव्या स्वरुपात
मनू वैर्‍याला हरवू
पुन्हा पुन्हा करु अंत

शिवरायाने चिरला
उभा मनू एकेकाळी
मुलाहिजा ना राखला
धर्माज्ञा ही ठोकरली

मनुविकृतीच्या चिंध्या
मिरविती डोईवर
हिंदवी स्वराज्याने
होती मारली पाचर

लक्ष देऊनिया ऐका
मनुधोक्याच्या या हाका
नाही नारीला स्वातंत्र्य
पितृसत्तेचाच हेका

कशी खुंटली अक्कल
कशी करशी तुलना
शिवरायांच्या नखाची
सर येईल का कुणा?

ओढा पूर्वसुरींचीच री
जी हुजूरी दरबारी
पेशीपेशीत भिनली
नमो लाचारी-चाकरी

पेशवाईच्या तोर्‍याला
षंढयुगी मिळे बळ
नित्य अजेंडे द्वेषाचे
तोंडी कायम गरळ

गायपट्टीची वैशिष्ठ्ये
अंगी भरली ठासून
सोवळ्याच्या थोतांडाने
पेठा जाहल्या पावन

विवेकाला सोडचिठ्ठी
विज्ञानाचे विस्मरण
विषगुरुच्या भूमीत
गायमुताचे शिंपण

नाही मनूचा अंमल
ना जातीच्या उतरंडी
घटनेने बांधलेली
मनुस्मृतीची तिरडी

भीमरायाने धरली
थेट मनूची गचांडी
केला कडेलोट त्याचा
आधी उपटली शेंडी

इथे चाले संविधान
नाही कर्मठ फर्मान
जळो जळो ऐसे तोंड
गाते मनूचे गुणगान

मनूकिर्तीचे गटार
वाहे ज्यांच्या तोंडातून
फुटो थोबाड तयांचे
नाकारती संविधान

शिवराय भीमराय
भारताचे दीपस्तंभ
मनुवादी औलादींचा
जावो जळोनिया दंभ
🍁
            -भरत यादव
      Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने