🚩
महाराष्ट्रदेशी फुटले वासनांधांना पेव
तयांच्या पायी घेती राजकारणी धाव
भोंदूचरणी मुर्खांचा स्थिर भक्तीभाव,
षंढयुगात या!
पुरोगामी राज्याला आलीसे अवकळा
महामानवांच्या नावे केवळ जपमाळा
विकृतीच्या भाळी शोभे धर्माचा टिळा
अभिमानास्पद!
महिलाआयोगाची जणू निघाली धिंड
मूढजन जिरवती अंधश्रद्धेचा कंड
खेटरानेच सडकवले असते ते तोंड
पक्षप्रमुखांनी!
वासनेच्या दरबारी सत्ताधार्यांची वरात
अध्यात्माच्या धंद्यात रमले आता खरात
बोगस भक्तीची दुकानदारी लई जोरात,
कर्मकांडयुक्त!
नाचवा डोक्यावरती ज्योतिषाचे थोतांड
रुप-भक्तीचा हा नवीन चाकणकर ब्रॅन्ड
लिंगपिसाटांचा नंगानाच चालला अखंड,
गोदामायतीरी!
बोगस गुरुपायी कितीक गेले वाया
डोईवरती छत्रछाया धरते एक बया
ओसंडून वाहे बलात्कार्याची माया
रात्रंदिवस!
आयाबहिणींच्या अब्रुवरती बुलडोझर फिरे
संरक्षित आणि सन्मानित बलात्कारी डुकरे
लुबाडून भक्तगणांना भरती आपली घरे,
लंपटखोर!
राजकारणी आणि भोंदूंची अभेद्य युती
सत्ताकारणाला त्याविना मिळेना गती
डोईजड नेतृत्वाला अडकवण्याची नीती,
नवचाणक्यांची!
धन्य भोंदूबाबा धन्य-धन्य त्याचे भक्त
शिकलेले म्हणविती शेण खाती फक्त
आधुनिक युगातही ऐसे अपकिर्तीवंत
निपजती नित्य!
आसाराम,रामरहीम,खरात किंवा गुंजाळ
अज्ञानाच्या दलदलीत सुमारांचा सुकाळ
धर्माच्या छाताडावरती नासकी पिलावळ,
नाचे थया थया!
श्रमाविना हवी आहे संपत्ती बख्खळ
हरामच्या पैशावरती सुरु चैन-चंगळ
बांडगुळे विसरुन जाती सुगंध निर्मळ,
परिश्रमाचा तो!
श्रद्धेआड अंधश्रद्धा पोसण्याचा काळ
सत्तालोभासाठी सुरु फुकट्यांचा सांभाळ
हरवली नितीमत्ता,रिक्त विवेक ओंजळ,
समाजनिष्ठ!
🚩 -भरत यादव
Bharat Yadav