🚩
वारकरी धर्माचा कोंडलेला श्वास
सनातनी कर्मठतेचा असह्य हा त्रास
नवनव्या भोंदूंची रोज सुरुच पैदास,
महाराष्ट्रामध्ये!
इगतपुरी भरविरेचा नकली वारकरी
वैराग्यमुर्ती गाडगेबाबांचा उपमर्द करी
वैदिकांच्या दलालांची वाढली मुजोरी,
सांप्रतकाळी!
अंधश्रद्धेचा केर त्यावर खराट्याचा वार
गाव नव्हे नुसते स्वच्छ लख्ख मेंदूचे वावर
विवेकदिशा दावी मिटे घोर अज्ञान अंधार,
ऐसे गा ते संत!
लबाडांची कितीकदा करावी खेटरपूजा
जना आणि मनाच्या सोडल्या रे लाजा
ज्ञानोबा-तुकोबांच्या नावावरती गमजा,
मारत फिरती!
खर्या संत सज्जनांची ठाऊक खूण
रंजल्या-गांजल्यांसाठी गावात किर्तन
हाताचेच ताट नि जलपान गाडग्यातून,
विरक्तवीरच!
त्र्यंबकी कुंभमेळ्याची साचली घाण
गोदामाय वाहते तरी मुकाट गुमान
कर्मकांड पसार्याने हरपले भान,
अभक्तांचे गा!
वारकरी धर्मात वाढली घूसखोरी
कर्मठ पिलावळ करीतसे शिरजोरी
धर्मसत्ता-राजसत्ता पाठराखण करी,
अशा थोतांडांची!
अंधरुढी धिक्कारी लोकप्रबोधन करी
विवेकी गाडगेबाबा गोरगरीबांचे कैवारी
वाळवंटातून विठूरायाशी संवाद करी
अखंडपणे!
मंबाजीचे भाऊबंद अजूनी जिवंत
दिवंगत संतांवर खार खाती नित्य
निंदा-नालस्तीची खोड अखेरपर्यंत,
जिरणार नाही!
देव नसे देवळात तेथे पुजार्याचे पोट
कोण ठणकावेल सांगा आज असे थेट
दलालांची उडाली म्हणून त्रेधातिरपीट,
साग्रसंगीत!
🚩 -भरत यादव
Bharat Yadav