मातेचा मारेकरी वंदनीय ठरवू
जयंतीउत्सवाचा धडाका उडवू
आद्य आततायीचा महिमा वाढवू
नव्याने पुन्हा!
'यत्र तत्र सर्वत्र' आमचीच सत्ता
अडविण्याची आहे कुणात क्षमता?
क्षत्रियांची तीच पराभूत मानसिकता
अद्यापही!
सक्रीय जाहल्या वैदिकांच्या टोळ्या
वर्गणीस्तव आल्या खांद्यावर झोळ्या
तापलेल्या तव्यावर भाजण्या पोळ्या,
सरसावले गा!
कितीवेळा आम्ही चाटवावी धूळ
सांस्कृतिक-राजकीय सत्तेचा खेळ
धर्मनामक षडयंत्राची आहे ती कळ
आमुच्या हाती!
पितृसत्ताकतेचे हे प्रतिक महाक्रूर
जमदग्नीने घडवला रेणूका संहार
मातृसत्ताकतेची तिथे घनघोर हार
जाहली होती!
सत्य दडपण्यासाठी पुराणनिर्मिती
वैदिकधार्जिणी मिथकांची संगती
खोट्यानाट्या कथांच्या मग उत्पत्ती
रचित र्हाती!
जातउतरंडीचे आम्ही मुख्य लाभार्थी
समरसता खपवतो समता नावावरती
कट्टरता-कर्मठता हीच खरी शक्ती,
ज्ञातिबांधवांची!
सहाव्या अवताराची पाहा अपूर्वाई
आक्रमक ब्राम्हणत्वाला नवी कल्हई
विषमतेची प्रतिष्ठापना ब्रह्म नवलाई
रस्त्यावरची!
चिरंजीव दैवताची करु या जयंती
सनातन धर्माची गाऊ नित्य आरती
उत्सवप्रिय समाजाची वर्धिष्णु किर्ती
जगामाजी!
घरातले देव्हार्यातले देव रस्त्यावर
आधीच्या उन्मादात अजून नवी भर
कर्मकांडात गुंतवण्यास सदाच तत्पर
धर्मव्यवस्था ही!
भरत यादव
Bharat Yadav