महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते ज्या महामानवांना आपले प्रेरणास्रोत मानतात त्या महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये समाज आमूलाग्रपणे बदलून टाकण्याची ताकद आहे. अकरा एप्रिल २०२६ ला क्रांतिसूर्य जोतिबांच्या द्विजन्मशताब्दीची सुरुवात झाली. त्यापाठोपाठ येणाऱ्या भीमजयंतीचा उत्सव देशभरात जल्लोषात आणि दणक्यात साजरा होत असतो.
उत्सवप्रिय तरुणाईने महामानवांचे पुतळे, प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी त्यांचे जाज्ज्वल्य विचार डोक्यात घेण्याचा हा काळ आहे. ज्या महामानव बाबासाहेबांनी जगातले सर्वश्रेष्ठ संविधान भारतीयांना दिले त्या संविधानाविषयी त्यांनीच लिहून ठेवले आहे की देशाची राज्यघटना कितीही उत्तम असली तरी तिची अंमलबजावणी करणारे जर नाकर्ते निपजले तर ती कुचकामी ठरेल!
एक द्रष्टे विचारवंत म्हणून बाबासाहेब काळाच्या पुढचे कसे पाहात होते याची यावरुन कल्पना यावी. आज लोकशाही व्यवस्थेची थट्टा मांडली जात आहे, संवैधानिक पदे आणि संस्था मोडीत काढल्या जात आहेत. जे भारतीय संविधान सामान्य भारतीय नागरिकांना अर्पण केले आहे, त्या आम जनतेलाच बेदखल करण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरु आहे. तळागाळातील उपेक्षित, पीडित आणि आदिवासी जनतेला संविधानाद्वारे सर्व न्याय्य हक्क अधिकार देण्याचे वचन देण्यात आले, त्यांच्या सबलीकरणाची ग्वाही देण्यात आली होती,
ते सगळे आता धाब्यावर बसवले जात आहे. फुले-शाहू-आंबेडकर ही विचारत्रयी म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख आहे. तीच पुसून टाकण्याच्या दिशेने गतीने पावले पडत आहेत. त्यांचे समाजोत्तेजक विचार जाणीवपूर्वक डावलले जात आहेत. त्यांच्या प्रतिमा, पुतळे यांनाच अतोनात महत्त्व येत चालले आहे. पण परिवर्तनाची लढाई वरचेवर अवघड बनत चाललेली असतानाच कुठून तरी त्याच अस्सल विचाराची ठिणगी पड़ते आणि अवध्या समाजाला प्रेरणा देऊन जाते. उल्हासनगरमध्ये घडलेली एक ताजी घटना विचारात घेण्यासारखी आहे. तेथील शांतीनगर भागातील स्मशानात काही वर्षांपूर्वी स्थानिक सत्ताधारी नेत्यांनी बाबासाहेबांचा पुतळा बसवला. स्मशानात महामानवाचा पुतळा ? अनेकांना ही बाब खटकली पण तोंड उघडणार कोण?
असा प्रश्न होता. पण 'कायद्याने वागा लोकचळवळ' चालवणारे *राज असरोडकर* यांनी मात्र कायदेशीर लढाई नेटाने लढत तो पुतळा स्मशानाबाहेर काढण्याची लढाई नुकतीच यशस्वीपणे जिंकली आहे. त्यासाठी त्यांनी अगोदर अनेक महिने पत्र, निवेदने दिली पण कुणीच दाद घेईना त्यानंतर त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाचे अस्त्र उपसले. आठवडाभराच्या आतच प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली आणि अखेर पुतळा स्मशानातून हटवण्यात आला. लोकशाहीत आणि प्रशासकीय नियमानुसार जेव्हा एखादी मागणी कायदेशीर चौकटीत बसणारी असते तेव्हा ती पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. मागणी योग्य कायद्याचा किंवा नियमाचा आधार घेऊन केली असेल तर प्रशासन ती कधीच नाकारु शकत नाही.
हे माहीत असल्यामुळेच असरोंडकर यांनी स्मशानभूमीतील पुतळ्याच्या प्रकरणात शासनाच्या पुतळा धोरणानुसार कारवाईची मागणी लावून धरली.
एखाद्या विषयावर केवळ तक्रार करुन उपयोग नाही, तर ती तक्रार कायदेशीर असावी लागते. जेव्हा तुम्ही नियम आणि पुराव्यांसह बोलता तेव्हा यंत्रणेला उत्तर द्यावेच लागते. प्रशासकीय यंत्रणा ही लोकांसाठीच असते. जेव्हा एखादी मागणी कायद्याला अनुसरुन असते, कोणताही अर्ज करताना त्यात संबंधित कलम किंवा शासन निर्णयाचा उल्लेख केल्यास प्रशासनाला त्यावर तातडीने कारवाई करणे भागच पडत असते.
हे चांगले ठाऊक असलेला कार्यकर्ताच आजच्या काळात घटनात्मक लढाई जोरकसपणे लढू शकतो. हा विषय लोकांसाठी अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याचा असल्याने त्यासाठी आंदोलन करणेदेखील प्रचंड जोखमीचे काम असते, त्याचबरोबर राजकीय अभिनिवेशाचा आरोपदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेब म्हणजे जिवंत माणसाला धगधगती क्रांतिप्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व, मग त्यांचा पुतळा स्मशानात बसवणारे नेमके काय सिध्द करु पाहात असतील बरे?
तर या लहानशा लढाईतून आपणही खूप काही शिकू शकतो. आपणांस आपले हक्क, अधिकार हवे असतील तर कायदे शिकून घ्या आणि संघर्षाला सज्ज व्हा, हाच मोलाचा संदेश या आंदोलनातून मिळतो. तात्पर्य एकच, विचाराची धग ही कायम असतेच फक्त आपण किती सतर्क आणि संवेदनक्षम आहोत हा खरा प्रश्न आहे. तर महामानवांचे जयंती उत्सव साजरे करताना आणि त्यांचा जयजयकार करताना काही गोष्टी आपण नीट ध्यानी घेतल्या तरी पुष्कळ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भात रत्नागिरीचे कवी *अमोल कदम* यांची एक छोटी कविता खूप मोठा आशय सांगणारी आहे-
घातली जात नाही, तुझ्या पुतळ्याला, दुधाची अंघोळ
केली जात नाही,
तशी कोणतीही प्राणप्रतिष्ठा
कारण आम्हाला माहीत असतं, किंवा माहीत आहे
कुठल्याही पुतळ्यात असा भरता येत नाहीं जीव,
तरीही तुझा पुतळा,
आमचा जीव की प्राण आहे,
तुझ्या दिशादर्शक बोटाला पाहिलं की, अंगात नवी चेतना संचारते,
तू आमच्या मेंदूत, रक्तात, हाडात आणि मांसपेशींमध्ये असाच भिनत जातोस, सामाजिक न्यायाच्या ऊर्जेला,
अधिक बलवान करत,
अधिक बलवान करत!
ज्येष्ठ विचारवंत
डॉ. यशवंत मनोहर म्हणतात,
माणूस या शब्दाचा अर्थच धडपड असा आहे. सन्मानाने टिकण्यासाठी, स्वतःला सतत सक्षम वा योग्य करण्यासाठीच ही धडपड असते. या धडपडीचे नाव विद्रोह असे आहे. या धडपडीचा प्रारंभ हाच माणसाच्या जगण्याचा प्रारंभ होता.
हा विद्रोहाचाच प्रारंभ होता आणि जीवनाचे सौंदर्य हेच त्याचे ध्येय होते. विद्रोह आणि सौंदर्य या बोधीवृक्षाच्या एकाच पानाच्या दोन अविभाज्य बाजू आहेत. सौंदर्याच्या तहानभुकेपोटी
विद्रोह जन्माला येतो आणि विद्रोहाच्या अनिवार्यतेपोटी सौंदर्य जन्माला येते. विद्रोह आणि सौंदर्य ही माणसाची सहजप्रवृत्तीच आहे. माणसाच्या या डीएनएने मानवी जगाचा प्रारंभही केला आणि आजवरची नवलाची वाटचालही केली. विद्रोह वा सौंदर्य ही माणसाची मूल प्रकृती आहे. आणि या मूल प्रकृतीकडे पाठ फिरवणे किंवा तिला विरोध करणे ही विकृती आहे. विद्रोह हेच जीवनाचे परमसत्यही आहे. तसेच परमसौंदर्यही आहे. या परमसौंदर्य सत्यानेच व परमर्सौंदर्यानेच माणसाला गगनभेदी माणूस केले.
माणसाला माणूसपणाचा हक्क देणाऱ्या प्रज्ञासूर्य महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १३५ व्या जयंती उत्सवानिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन!
✍
( भरत यादव )
yadavbh515@gmail.com
9890140500