सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!

धन्य धन्य भूषण गवई परिवार
थोतांडापुढे पूर्ण जाहला लाचार
विचाराची आग विझून गेली पार
झाले बेईमान!

संविधानाने दिलेली पत-प्रतिष्ठा
मनुस्मृतीपुढे वाहिली यांनी निष्ठा
लाचारीची करती पार पराकाष्ठा
सत्तेपुढती!

वेशीवरती टांगला बा स्वाभिमान
खराटा-गाडग्याचे घडे विस्मरण
वैदिक धर्मसत्तेपुढे हुजरे होऊन
घोटती लाळ!

बा भीमराया तुझे फेडती पांग
संविधान समक्ष वठवती सोंग
संपेचि ना हाव,लाभासाठी रांग
लांबच लांब!

पुसू पाहती धम्म क्रांतीच्या खूणा
विसरल्या विसरल्या बावीस प्रतिज्ञा
अन् दीक्षाभूमीवरची ती भीमगर्जना
विसरलेली!

शिकलेल्यांनी दिला समाजाला दगा
तृष्णेपायी सोडून दिले सम्यक मार्गा
बाष्कळ भोंदूसाठी गा तोडला धागा
भीमविचाराचा!

ब्राह्मण्याचा अजगर गिळत सुटलेला
बहूजन ऐक्याचा अगा मार्ग खुंटलेला
विषगुरुपदाचा टप्पा देशाने गाठलेला
एका दमात!

पुढार्‍यांना लागले भिकेचे डोहाळे
अतिप्रिय त्यांना फक्त सत्तेचे सोहळे
तयांच्या कृतघ्नतेने समाजमन जळे
अनवरत!

रेशीमबागेशी थेट बांधले संधान
मुर्ख धीरेंद्राच्या पायाशी लोळण
सर्वोच्चपदाचीही घालवली शान
झुकली मान!

प्रतिक्रांतीसाठी तुम्ही सोडले इमान
निळ्यासागरास दिलेले मोडले वचन
न्या. लोयांच्या खून्यांची पाठराखण
करते झाले!
                              -भरत यादव
                         Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने