अगा सुटेनाशी झाली सत्ता
या सत्तेसाठी खाऊ लाथा
सन्मानपदे आणि मालमत्ता
कमावत राहू!
गोड फळे चाखता सत्तेची
चाड राहीना नितीमत्तेची
अप्पलपोट्या वृत्तीची
येईना बा चीड!
संतवचनांचा देत दाखला
लोकांना बहू उपदेश केला
स्वतः मात्र उगा राहिला
कोरडा पाषाण!
वानप्रस्थाश्रमाचा हा काळ
परि प्रपंची रमला सर्व वेळ
तृष्णेची तहान जगड्व्याळ
संपता संपेना!
पोराबाळांच्या काळजीपोटी
गुंतवून घेतला जीव शेवटी
सापळ्यात बा प्रतिष्ठेपोटी
अडकले स्वंये!
विवेकाशी नाते ना जडले
टोळीत गुलामांच्या रमले
पदरात जे जे काही पडले
मानले गोड!
काही केल्या सुटेना मोह
म्हणती हाचि मुख्य प्रवाह
विद्रोही विचाराचा दाह
साहवेना आता!
सत्तेची महत्ता अपार
अंगारही पडतो गार
स्विकारती पुरस्कार
तुकवूनी मान!
विचारविहीन मेंदू प्रिय
व्यवस्थेचे निश्चित ध्येय
शोषणाचे ना ना उपाय
योजलेले गा!
गावपांढरीशी केली प्रतारणा
फॅसिष्टांचा उचलती मेणा
डोईवर मिरवती वहाणा
अभिमानाने!
मेंदू मेंदू फासावर चढले
पिढीजात जे गुलाम बनले
त्यांनी सकळ राष्ट्र नासवले
स्वार्थापायी!
-भरत यादव
Bharat Yadav